Vipassana code of Discipline in Marathi

10 Days Vipassana Meditation course code of Discipline in Marathi

विपश्यना (Vipassana) ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. मानवजातिपासून हरवलेली,आजपासून जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी गौतम बुध्दाने पुन्हा शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याच प्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया(साधना) आहे. कुणिही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाव्दारे सुरूवात करतो. तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जातिस्वभावाचे निरिक्षण करु लागतो आणि नश्वरता,दुःख व अहंभावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे. हा संपूर्ण मार्ग(Dhamma) म्हणजे जागतिक वाद-विषयांवर एक जागतिक उपाय आहे आणि ह्याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी देणे घेणे नाही. ह्याच कारणामुळे, कुणिही, वंश,समाज किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी, ह्याचा मुक्तपणे अभ्यास करु शकतो, आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल.

 

 

विपश्यना काय नाही:

  • विपश्यना अंधश्रध्देवर आधारीत कर्मकांड नाही.
  • ही साधना बौध्दिक मनोरंजन किंवा दार्शनिक वादविवादासाठी नाही.
  • ही सुट्टी घालविण्यासाठी किंवा सामाजिक आदानप्रदानासाठी नाही.
  • ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून पलायन करविणारी साधना नाही.

 

 

विपश्यना काय आहे:

  • ही दुःखमुक्तिची साधना आहे.
  • ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतिपूर्वक तसेच संतुलित राहून करु शकेल.
  • ही जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या निर्मितीमध्ये सहयोगी होतो.

 

विपश्यना साधनेचे उच्चतम आध्यात्मिक लक्ष्य विकारांपासून संपूर्ण मुक्ती आणि बोधि प्राप्त करणे आहे. साधनेचा उद्देश केवळ शारिरीक दुःखांपासून मुक्ती नाही. परंतु, चित्तशुद्धीमुळे कित्येक मनोशारीरिक (सायकोसोमॅटिक) आजार आपोआप दूर होतात. वस्तुतः विपश्यना ही दुःखाची मूळ तीन कारणे – मोह, द्वेष तसेच अविद्या दूर करते. तर जो कुणी ह्या साधनेचा नियमित अभ्यास करत राहिला तर एकेक पाऊल पुढे जात राहून आपल्या मानसिक विकारांपासून पूर्ण मुक्त होऊन नितांत विमुक्त अवस्थेचा साक्षात्कार करू शकतो.

विपश्यना साधना गौतम बुद्धांनी शोधून काढली असली, तरी ह्या साधनेचा अभ्यास बौद्धजनांपर्यंत मर्यादित नाही. कोणत्याही पार्श्वभूमीची व्यक्ती ही करू शकते आणि ह्याचा लाभ घेऊ शकते. विपश्यना शिबीरे अशा व्यक्तिंसाठी खुली आहेत की जे प्रामाणिकपणे ही विधी शिकू इच्छितात. ह्यामध्ये कुल, जाति, धर्म किंवा राष्ट्रियता आड येत नाही. जगभरातील हिन्दु, मुस्लीम, शीख, बौद्ध, ईसाई, यहुदी तसेच अनेक अन्य संप्रदायातील व्यक्तींनी अत्यंत यशस्वीततेने विपश्यना साधनेचे लाभ अनुभवले आहेत कारण रोग सार्वजनीन आहे म्हणूनच इलाजदेखील सार्वजनीन व्हायला पाहिजे.

साधना तसेच स्वयंशासन

आत्मनिरिक्षणाद्वारे आत्मशुद्धिची साधना निश्चितच सोपी नाही – साधकांना खूप परिश्रम करावे लागतात. स्वतःच्या प्रयत्नाने साधक स्वानुभवातून आपली प्रज्ञा जागृत करतात; दुसरी कुणी व्यक्ती त्याच्यासाठी हे काम करू शकत नाही. म्हणूनच, स्वेच्छेने गंभीरपणे आणि स्वयंशासन पाळणाऱ्या व्यक्तीना ही साधना उपयुक्त होइल, जी साधकाच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी आहे व शिबीराची अनुशासन संहिता ही साधनेचेच एक अंग आहे.

अंतरमनात खोलवर जाऊन तिथे साचलेल्या संस्कारांचे निर्मुलन करण्याची साधना शिकण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी निश्चितच खूप कमी आहे. एकांतामध्ये अभ्यासाची निरंतरता ठेवणे हीच ह्या साधनेतील यशाची गुरुकिल्ली आहे. हा दृष्टिकोन लक्षात ठेऊनच नियमावली आणि समय-सारिणी बनवलेली आहे. ती आचार्य अथवा व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी नाही. तसेच ते कुठल्याही परंपरेचे अंधानुकरण नाही किंवा कोणतीही अंधश्रध्दा नाही. ह्यामागे हजारो साधकांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवाचा वैज्ञानिक तसेच तर्कसंगत आधार आहे. नियमांचे पालन केल्याने साधनेसाठी अनुकूल वातावरण तयार होते; नियम तोडल्याने हे वातावरण दूषित होते.

शिबीरार्थीना शिबीराच्या संपूर्ण ११ दिवसाच्या कालावधीत शिबीरस्थळी राहाणे बंधनकारक आहे. येथील नियमावलीतील अन्य नियमदेखील काळजीपूर्वक वाचावे. जे ह्या नियमावलीचे निष्ठेने तसेच गंभीरतेने पालन करू शकतात त्यांनीच शिबीरामध्ये प्रवेशासाठी आवेदन करावे. जे निर्धारित प्रयत्न करण्यास अनुकूल नाहीत ते त्यांचा स्वतःचा वेळ तर वाया घालवतीलच, तसेच गंभीरतापूर्वक काम करू इच्छिणाऱ्याना बाधा निर्माण करतील. नियमावली कठिण वाटल्याने शिबीर सोडून जाणे हे हानिकारक तसेच अनुचित आहे हे आवेदकाने समजून घ्यावे. तसेच वेळोवेळी समजावूनसुद्धा शिबीरार्थी नियमावलीचे पालन करत नसल्यास त्यांना शिबीर सोडून जायला सांगणे हे अधिक दुर्भाग्यपूर्ण असेल.

मानसिक रोगांच्या पीडित लोकांसाठी

गंभीर मानसिक रोगाने पीडीत व्यक्ती कधीकधी ह्या आशेने विपश्यना शिबीराला येतात की ही साधना त्यांचे सर्व मानसिक रोग दूर करेल. अस्थिर मन विविध उपचारांमुळे व काही गंभीर मानसिक आजारांमुळे अशा व्यक्तीना लाभ मिळणे दुरच पण कित्येकदा दहा दिवसांचे शिबीर पूर्ण करणे त्यांना कठीण होऊ शकते. नॉन-प्रोफेशनल स्वयंसेवी संघटनेच्या रूपातील आमची क्षमता अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी असमर्थ आहे. जरी विपश्यना साधना बहुतेकांसाठी लाभदायक असली, तरी ही साधना औषधोपचार तसेच मानसोपचारांच्या ऐवजी नाही. तसेच गंभीर मानसिक रूग्णांना आम्ही ह्या साधनेची शिफारस करीत नाही.

अनुशासन संहिता

शील (sīla) अर्थात नैतिक वर्तणुक हा साधनेचा पाया आहे. समाधीच्या (samādhi)म्हणजे मनाच्या एकाग्रतेच्या विकासासाठी शील हाच पाया आहे; आणि मनाची शुध्दता प्रज्ञेव्दारे(paññā) होते — आंतरिक ज्ञान.

शील

 

सर्व शिबीरार्थीना शिबीरादरम्यान पांच शीलांचे पालन करणे अनिवार्य आहे:

  1. कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे;
  2. चोरी न करणे.
  3. अब्रह्मचर्य(मैथुन) पासून दूर राहणे
  4. खोटे बोलण्यापासून दूर राहणे.
  5. नशा करणाऱ्या वस्तूपासून दूर राहणे.

 

 

जुने साधक, अर्थात असे साधक की ज्यांनी आचार्य गोयन्काजी किंवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर दहा दिवशीय शिबीर पूर्ण केले आहे त्याना आणखी तीन शीलांचे शीलांचे पालन करावे लागेल:

  1. दुपारनंतर भोजन वर्ज करणे.
  2. शॄंगार-प्रसाधन तसेच मनोरंजन वर्ज करणे
  3. ऊंच किंवा आरामदेही शय्या वर्ज करणे.

 

जुने साधक सायंकाळी ५ वाजता लिंबू पाणी घेऊन सहावे शील पाळतील, परंतु नवे साधक दुधासहित चहा आणि फळे घेऊ शकतील. आजारी किंवा विशिष्ट परिस्थितीत जुन्या साधकांना फलाहाराची सूट अचार्यांच्या अनुमतीने घेता येते. सातवे आणि आठवे शील सर्वांना बंधनकारक आहे.

समर्पण

साधना-शिबीराच्या कालावधीत साधकाला आपल्या आचार्यांप्रति, विपश्यना विधि प्रति तसेच संपूर्ण अनुशासन-संहिते प्रति पूर्णपणे समर्पित व्हावे लागेल. समर्पित भावना असल्यावरच निष्ठापूर्वक काम होऊ शकेल आणि विवेकपूर्वक श्रध्दा उत्पन्न होईल की ज्याची साधकाला आपली सुरक्षितता आणि मार्गदर्शनासाठी नितांत आवश्यकता आहे.

सांप्रदायिक कर्मकांड तसेच दुसऱ्या साधना-विधि बरोबर संमिश्रण

शिबिरादरम्यान साधक कोणत्याही अन्य प्रकारची साधना-विधि व पूजा-पाठ, धूप-दीप, माला-जप, भजन-किर्तन, व्रत-उपवास आदि कर्मकांडाचा अवलंब न करणे निश्चितपणे अत्यावश्यक आहे. दुसरी साधनाविधि किंवा आध्यात्मिक विधि तहकूब ठेवावी. ह्याचा अर्थ असा नव्हे की दुसऱ्या साधना-विधि किंवा पध्दती निंदनीय आहेत, परंतू शुध्द विपश्यना विधिला अजमावून पहाण्याला न्याय देण्यासाठी हे आवश्यक आहे.

विपश्यनेबरोबर जाणून बूजून दुसऱ्या कोणत्याही साधना विधिचे संमिश्रण करने हानिकारक होऊ शकते. आचार्यांनी वारंवार सूचना देऊनही साधकानी ह्या विधिबरोबर कर्मकांड व दुसऱ्या रीतीचे संमिश्रण केल्याने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे. जर कोणता संभ्रम किंवा प्रश्न असल्यास त्याने आचार्यांना भेटून शंका समाधान करून घ्यावे.

आचार्यांना भेटणे

साधकाला आवश्यक वाटल्यास आपल्या समस्येसाठी दुपारी १२ ते १ दरम्यान आचार्यांना एकटे भेटू शकतात. रात्री ९ ते ९.३० वाजता ध्यानकक्षात देखील सार्वजनिक प्रश्नोत्तरे उपलब्ध असतील. भेटणे आणि प्रश्नोत्तराची वेळ विपश्यना विधिच्या स्पष्टीकरणासाठी व सायंकाळच्या प्रवचनातून उद्भवलेल्या प्रश्नांसाठीच आहे.

आर्य मौन

शिबिराचा आरंभ झाल्यापासून दहाव्या दिवशी साधारणतः सकाळी दहापर्यंत आर्यमौन म्हणजेच शरीर तसेच वाणीने मौन पाळावे लागेल. दुसऱ्याबरोबर शारीरीक संकेताव्दारे किंवा लिहून वाचून विचार विनिमय करण्यास मनाई आहे.

अत्यंत आवश्यक असेल तेव्हा साधकांना अन्न, रहाण्याची सोय, शरीर स्वास्थ, इत्यादिसंबधी व्यवस्थापन आणि विधि समजावून घेण्यासाठी आचार्यांबरोबर बोलण्याची सूट आहे. विपश्यना साधना हा व्यक्तिगत अभ्यास आहे. परंतु ह्या संपर्काच्या वेळी देखील कमीतकमी बोलावे. प्रत्येक साधकाने स्वतःला एकटे समजून एकांतात असल्याप्रमाणे साधनेत व्यग्र व्हावे.

पुरूष आणि महिलांनी वेगळे वेगळे राहणे.

राहण्याची जागा, अभ्यास, विश्रांती आणि भोजनाच्या वेळी पुरुष व महिलांना वेगळे वेगळे राहावे लागेल. शिबीरादरम्यान पतीपत्नीचा किंवा जोडीदाराशी संपर्क नसावा. हेच नियम मित्र आणि कुटुंबातील अन्य सदस्याना लागू आहेत.

शारीरिक स्पर्श

शिबीरादरम्यान संपूर्ण कालावधीत साधकांनी एकमेकास अजिबात स्पर्श करू नये.

योगासन तसेच शारिरीक व्यायाम

विपश्यना साधनेबरोबर योगासन व दुसरे शारीरिक व्यायाम करणे मान्य आहेत, परंन्तू शिबीरादरम्यान हे स्थगीत ठेवावे कारण केंद्रामध्ये सध्यातरी ह्यासाठी आवश्यक अशा एकांतातील सुविधा उपलब्ध नाहीत. जॉगींगला देखील परवानगी नाही. म्हणूनच साधक विश्रांतीच्या वेळेस पाहिजे तर निर्धारि्त स्थानी चालण्याचा व्यायाम करू शकतात.

मंत्राभिषिक्त माळा-कंठी, गंडा-ताइत इत्यादि

उपरोक्त वस्तू साधकाने आपल्या सोबत शिबीरस्थानी आणू नयेत. चुकून आणल्यास त्या शिबीर कालावधीपर्यंत म्हणजेच दहा दिवसांसाठी व्यवस्थापनाकडे सुपूर्द कराव्यात.

नशा आणणाऱ्या वस्तू, धुम्रपान, जर्दा-तंबाखू आणि औषधे

मादक औषधी, मद्यार्क किंवा भांग, गांजा, चरस इत्यादिं सारखे दुसरे अंमली पदार्थ शिबीरस्थानी आणू नयेत. देशाच्या कायद्याअंतर्गत ह्या वस्तू बाळगणे हा गुन्हा आहे. झोपेच्या गोळ्या, आणि तत्सम उपशामकाना देखील हे लागू आहे. रोगी साधकाने डॉक्टरानी दिलेली आपली सर्व औषधे आचार्यांना दाखवावीत.

तंबाखू-जर्दा, धूम्रपान

स्वास्थ आणि स्वस्थतेसाठी केंद्र स्थानावर धूम्रपान किंवा जर्दा-तंबाखू खाण्यास सख्त मनाई आहे.

भोजन

विभीन्न समुदायांच्या साधकांसाठी आपल्या आवडीचे भोजन उपलब्ध करुन देण्यांत व्यावहारिक अडचणी आहेत. म्हणून साधकाना विनंती आहे की व्यवस्थापनाव्दारे दिले जाणारे साधे, सात्विक, निरामिष व साधनेला योग्य अशा भोजनाची व्यवस्था केली जाते, त्यातच समाधानी व्हावे. जर साधकाला आजारपणामुळे चिकित्सकाने विशेष भोजन घ्यायला सांगीतले असेल तर त्याने आवेदन पत्र तसेच शिबीराच्या प्रवेशाच्या वेळी त्याची सूचना व्यवस्थापकाकडे द्यावी. उपवास करण्यास परवानगी नाही.

वेश-भूषा

शरीर व वस्त्रांची स्वच्छता, वेश-भूषेंतील साधेपणा तसेच शिष्टाचाराची आवश्यकता आहे. झिरझिरीत कपडे घालणे निषिध्द आहे. घट्ट, बिनबाह्यांचे, तंग, तसेच तोकडे कपडे घालू नयेत. सूर्य-स्नान आणि अर्धनग्नता वर्ज्य आहे. महिलांनी कुडत्याबरोबर दुपट्ट्याचा वापर करावा. दुसऱ्यांचे चित्त विचलीत न होण्यासाठी हे महत्वाचे आहे.

धोबी-सेवा तसेच स्नान

बहुतांश केंद्रावर धोबी-सेवा उपलब्ध नसते. ज्या केंद्रावर जाणार असाल, तेथे ह्याची चौकशी करावी. धोबी-सेवा उपलब्ध नसल्यास साधकांनी पुरेसे कपडे सोबत आणावेत. छोटे कपडे हातानी धुता येतील. स्नान तसेच कपडे धुणे विश्रांतीच्या वेळेसच करावे, साधनेच्या काळात नाही.

बाह्य संपर्क

शिबीराच्या कालावधीत साधकाने शिबीराच्या हद्दीतच रहावे. आचार्यांच्या विशिष्ट अनुमतीने ते जाऊ शकतात. शिबीर संपेपर्यंत बाह्य संपर्क करु नये. ह्या अवधित कुणाशीही टेलीफोन अथवा पत्राव्दारे किंवा अतिथीशी संपर्क करु नये. शिबीर संपेपर्यंत सेलफोन, पेजर, आणि दुसर्‍या इलेक्ट्रानिक वस्तु व्यवस्थापनाकडे जमा करुन ठेवाव्यात. निकडीच्या प्रसंगी मित्र किंवा आप्त व्यवस्थापनाशी संपर्क करु शकतात.

लिहिणे,वाचणे तसेच संगीत

शिबीरादरम्यान संगीत, गाणे ऐकण्यास किंवा वाद्य वाजविण्यास मनाई आहे. शिबीरामध्ये लिहीणे-वाचण्यास मनाई असल्यामुळे येताना कोणतेही लिहीणे-वाचण्याचे साहित्य बरोबर आणू नये. साधकाने विचलीत होऊ नये म्हणून नोट्स लिहू नयेत. वाचणे आणि लिहिण्यावर बंधन अशासाठी आहेत की विपश्यना साधकांनी साधनेच्या प्रयोगात्मक विधिवरच जोर द्यावा. धार्मिक तसेच विपश्यने संबंधी पुस्तके देखील वाचू नयेत.

टेप रेकॉर्डर तसेच कॅमेरा

आचार्यांच्या विशिष्ट अनुमतीशिवाय केंद्रावर ह्याचा उपयोग करू नये.

शिबीराचा खर्च

विपश्यनेसारख्या अनमोल साधनेचे शिक्षण पूर्णपणे निःशुल्क दिले जाते. विपश्यनेच्या शुद्ध परंपरेनुसार शिबीरांचा खर्च ह्या साधनेमुळे लाभ झालेल्या आणि कृतज्ञतेने भारावून गेलेल्या साधकांकडून दिल्या जाणाऱ्या ऐच्छिक दानावर चालतो. ज्यांनी आचार्य गोयंकाजी किंवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर कमीतकमी एक दहा दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे, केवळ अशा साधकांकडूनच शिबीराअंती किंवा नंतर दान स्विकारले जाते.

अशा प्रकारे ज्यांना ह्या विधिमुळे सुख-शांती मिळाली आहे अशांच्या मंगल चेतनेतून दिल्या गेलेल्या दानावर शिबिरे भरविली जातात. ही सुख-शांती सर्व लोकांना मिळावी व हे काम दीर्घकाळ चालू राहून अनेकानेक लोकांना ही सूख-शांती मिळत राहावी ह्या मंगल चेतनेनुसार साधक दान देतात. ह्या परंपरेनुसार भरविली जाणाऱ्या शिबिरांचा खर्च ह्या मिळणारे दानावरच चालतो. उत्पन्नाचा दुसरा कोणताही अन्य स्त्रोत नाही. दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी आचार्य किंवा धर्मसेवकांना कोणताही मोबदला दिला जात नाही. ह्यामुळे विपश्यनेचा प्रसार शुध्द स्वरूपात व्यापारीकरणापासून मुक्त आहे.

दान मोठे असो किंवा छोटे, त्यामागे दुसऱ्यांना मदत व्हावी अशी प्रेरणा हवी. बहुजनाच्या हित-सुखाची चेतना जागॄत झाल्यास त्या बदल्यात नांव, यश किंवा त्या बदल्यात आपल्यासाठी विशिष्ट सुविधा मिळण्याचा उद्देश सोडून आपल्या श्रध्दा व शक्तिनुसार साधक दान देऊ शकतात.

सारांश

अनुशासन संहितेचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी काही मुद्दे खालीलप्रमाणेः

दुसऱ्या साधकांना बाधा होणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या साधकांकडून बाधा झाल्यास दुर्लक्ष करा.

जर उपरोक्त नियमामधील कोणत्याही नियमामागे कोणती व्यावहारिक कारणे आहेत हे साधकाला न समजल्यास त्याने आचार्याना भेटून आपला संदेह दूर करावा.

निष्ठा तसेच गंभीरतापूर्वक अनुशासन पाळण्यामुळेच साधना विधि ठीक प्रकारे समजू शकाल तसेच त्याचा पर्याप्त लाभ घेऊ शकाल. शिबिराचा पूर्ण जोर प्रत्यक्ष काम करण्यावर आहे. अशी गंभीरता ठेवा की जसे काय आपण एकटेच एकांतात ध्यान करीत आहोत. मन आंतमध्ये असू द्या, तसेच असुविधा आणि विघ्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष करा.

साधकाची विपश्यनेमधील प्रगती आपल्या सद्गुणावर व वैयक्तिक विकास आणि पाच अंगावर म्हणजेच परिश्रम, श्रध्दा, प्रामाणिकपणा, आरोग्य आणि प्रज्ञा यावर अवलंबून आहे.

वरील माहितीमुळे आपल्या साधनेमध्ये अधिकात अधिक फायदा विपश्यना शिबीरामुळे होवो. शिबीर व्यवस्थापक आपल्या सेवेसाठी आणि सहयोगासाठी सदैव तत्पर आहेत आणि विपश्यनेच्या अनुभवातून फूलणाऱ्या तुमच्या यशाची व सुख-शांतीची मंगल कामना करत आहेत.

शिबीराचे वेळापत्रक

हे वेळापत्रक(समय-सारिणी) अभ्यासाची निरंतरता कायम ठेवण्यासाठी तयार केले गेले आहे. चांगल्या परिणामासाठी साधकाने त्याचे संपूर्ण पालन करावे.

 

प्रातः 4:00 वाजता प्रातः उठण्याची घंटी
4:30 ते 6:30 सकाळी हॉल मध्ये किंवा निवासस्थानी ध्यान
6:30 ते 8:00 सकाळी नाश्त्यासाठी सुट्टी
8:00 ते 9:00 सकाळी हॉलमध्ये सामूहिक साधना
9:00 ते 11:00 सकाळी आचार्यांच्या निर्देशानुसार हॉलमध्ये अथवा निवासस्थानी ध्यान
11:00 ते 12:00 दुपारी जेवणासाठी सुट्टी
12 दुपारी ते 1:00 pm विश्रांती आणि आचार्यांशी संवाद
1:00 ते 2:30 pm हॉलमध्ये किंवा निवासस्थानी ध्यान
2:30 ते 3:30 pm हॉलमध्ये सामूहिक साधना
3:30 ते 5:00 pm आचार्यांच्या निर्देशानुसार हॉलमध्ये किंवा निवासस्थानी ध्यान
5:00 ते 6:00 pm चहासाठी सुट्टी
6:00 ते 7:00 pm हॉलमध्ये सामूहिक साधना
7:00 ते 8:15 pm हॉलमध्ये आचार्यांचे प्रवचन
8:15 ते 9:00 pm हॉलमध्ये सामूहिक साधना
9:00 ते 9:30 pm हॉलमध्ये प्रश्नोंत्तराची वेळ
9:30 pm आपल्य स्वत: च्या खोलीमध्ये निवृत्त – दिवे बंद

 

शिबीरांत प्रवेश घेण्याआधी आपण उपरोक्त अनुशासन संहितेची प्रत वाचण्यासाठी व पाहण्यासाठी अडोबी एक्रोबॅट मध्ये येथे डाउनलोड करू शकता. आपण प्रस्तावित विपश्यना शिबीराच्या प्रवेशासाठी आवेदन करू शकता.

Open chat
1
Jay Bhim, How can I help you?